मित्रहो

 

सहजच विचार करत बसलो होतो आणि काही लोक, काही प्रसंग कसे आपल्या जडण घडणीत महत्वाचे ठरतात हे पुन्हा एकदा जाणवल. सध्या थँक्सगिविंग आठवडा साजरा होतो आहे. तर वाटलं की अगदी फॉर्मल थॅंक यू नाही तरी त्या अनुभवांची उजळणी करायला हरकत नाही.

खरं तर या पशिमी पद्धती मुळे नाही पण माझ्या लवकरच येणाऱ्या बेचाळीसाव्या वाढदिवासमुळे मी आजकाल जरा अंतर्मुख झालो आहे. खूप लांबचा पल्ला गाठला आहे असं काहीसं वाटत होतं (म्हणजे खूप काही दिवे लावलेले नाहीत आणि अजूनही खूप काही करायची इच्छा/खुमखुमी आहे ...😊 ). पण मागे वळून पाहतांना काही ठळक टप्पे सहज लक्षात येतात. त्यातला एक म्हणजे batu.

मी पुण्यात आलो आणि लक्षात आलं की स्पर्धेत आपण कुठेच नाही. माझ्यासारख्या छोट्या शहरातल्यासाठी पुणे आणि इथली चढाओढ दोन्हीही खूप नवीन आणि दडपवून टाकणारी होती. आपला निभाव लागणार नाही हे पण कळत होतं. त्यात माझा पहिला जॉब icici बँकेतला होता आणि त्या सगळ्या एटीएम समोर ताटकळत आणि लोकांची हेटाळणी झेलत काढलेल्या दुपारी सुद्धा फरश्या उत्साहवर्धक नव्हत्याच.

आणि मग batu नामक दुनियेत प्रवेश झाला. प्रवेशाचा सुद्धा एक वेगळाच किस्सा आहे पण तो नंतर कधीतरी.... तर batu ने त्या दोन वर्षांत माझं जग बदलल. तुम्हाला उगाच वाटेल की मी अभ्यासात खूप हुशार वगैरे होतो आणि म्हणून एम टेक ची पदवी घेऊन माझा काया पालट का काय झाला.. पण तसं काही नव्हतं. अभ्यासात काय मला काशातच गती नव्हती (आणि माझ्या बायकोला विचाराल तर अजूनही नाही) त्यामुळे तशी काही सक्सेस स्टोरी आम्हाला लखलाभ नाही. पण batu ने मला काय दिलं तर एकदम एकनंबरी लोकांची भेट घडवली. आणि त्या सर्व लोकांनी मला माणसात आणलं. आणि आजतागायत ठेवलं.

मला आठवतं पहिल्याच दिवशी (मला वाटतं प्रवेश घ्यायच्या वेळी का त्याहूनही आधी परीक्षेच्या वेळी) द ग्रेट नितीन देवतळे भेटले. भेटताच डाउट आला मला (😊) पण त्याच्यामुळेच त्या दिवशी तगलो. आणि मला वाटतं इन्स्टंट मैत्री झाली. त्याच्याच जिवावर (नित्यावर कितपत विश्वास ठेवावा किवा ठेऊ नये एव्हडी समज नव्हती आली अजून) प्रवेश घेऊन आलो आणि हॉस्टेल ला गेलो. नित्या म्हणजे एकदम मोकळा ढकळा माणूस (सर्वच बाबतीत 😉). माझ्या स्वभावाच्या एकदम विरुद्ध. मला वाटतं मी सर्वात जास्त नित्या सोबत राहिलो. आता याच्या काही गोष्टी तर्काच्या पालिकडल्या होत्या पण त्यात सुद्धा मजा होती. हा प्राणी अजूनही तसाच आहे. खूप क्वचित भेटतो आम्ही पण दरवेळी भेटला की थोडा तरी अजून mature झाला असेल अशी आशा असते पण ह्याने शपथच घेतली आहे... 😊

हॉस्टेल ला मला माझा पार्टनर भेटला. त्या पहिल्या दिवसापासून ते आजतागायत मी अनिरुद्ध या मानुष्या बाबत अचंबित आहे. मंत्रमुग्ध वगैरे का काय सुद्धा म्हणता येईल. हा म्हणजे मी भेटलेल्या माणसांमध्ये सर्वात अवलिया माणूस. आणि अजूनही आवडता माणूस. त्याने मला भेटताच जुजबी ओळख झाल्या झाल्या विचारलं .. बियर पिणार का? आणि तिथून पुढे प्रत्येक दिवशी मला त्याने अजून नवीन नवीन गोष्टींची ओळख करून दिली. माझी पहिली दारू, सिगरेट याच्याच सोबत प्यालो मी. मराठीत उत्तर तयार करून (हा पठया वहीत पण मराठीतच लिहायचा) नंतर इंग्रजीत करून पेपर लिहायचा. त्यामुळे सगळीच बोंब होती. त्यामुळे आमच्या बौद्धिक क्षमतेत पार्टनर मुळे काही भर पडली नाही. पण त्याच्या कविता, त्याच्या गोष्टी (माणसांच्या गोष्टी, त्यांची वर्णने) आणि आयुष्याचं तत्वज्ञान याने मात्र खूप वैचारिक भर पडली. एक हिन्दी गाण्यांची पसंती सोडली तर बाकी बऱ्याच बाबतीत आम्ही सहमत असायचो. कधी तरी एकदा हॉस्टेल वर आण्या मला म्हणतो “आयुष्यात प्रत्येक जण आपल्याला त्यांचे त्यांचे काही क्षण देऊन जातो आणि आपलं आयुष्य असं या सर्व क्षणांच मिळून बणतं”. आता आण्या खरंच हे असंच बोलला याला काही पुरावा नाही पण हे आणि असलं बरंच काही शिल्लक राहिलं माझ्यासोबत. ह्याला आजही भेटणे म्हणजे कमाल असतं. ह्याचे किस्से, हकीकती आजही अव्याहत वाहत असतात. फक्त त्यातले characters बदलले आहेत (काही काही लोक याच्या आयुष्यात कसे आणि का येतात हे आम्हालाच काय या पठयाला स्वतःलाही कळत नाही).

मग बाजूच्या हॉस्टेल ला नील्या भेटला. खाली बसून काही तरी सोल्डर करत बसला होता. कसं काय माहिती पण या पठयाला एक स्वतंत्र रूम होती. आणि रूम भर त्याचं कामाचं सामान पसरलं होतं. मला वाटतं की नील्यासोबत मैत्री व्हायला फारसा वेळ नाही लागला. हा संगळयांसोबत असतोही आणि नसतोही. नील्या आपले दात दाखवत हसला की एक भारी फीलिंग येते. म्हणजे एकदम असा एक कॉन्फिडंस भरतो की सगळं चांगलं आहे आणि सगळं शक्य आहे. मी या प्राण्याला स्वस्थ बसलेला बघितलच नाही. सतत काही तरी विचार आणि काही तरी ऊचापती (चांगल्या अर्थाने) चालू असायच्या आणि आजतागायत हा स्वस्थ बसलेला नाही. नील्या चा अभिमान आहे मला. म्हणजे सुरुवातीचे कित्येक वर्ष मी नील्या कडून आपल्या कामाची पावती मिळते का याची वाट बघायचो. अनिरुद्ध सारखाच मी नीलेश मुळे सुद्धा घडलो. मी खरं तर कामाविषयी नील्या ला कॉपी करायचा प्रयत्न करायचो. मला वाटतं की मी embedded मधे काम करण्यामागे कुठेतरी त्याचाच कडून घेतलेली प्रेरणा होती.

मग स्नेहल भेटली. खरं तर मला तिची भीतीच वाटायची. तिची आणि नीलेश ची जोडी होती (हे आम्हा कर्म आंधळ्याला खूप नंतर लक्षात आलं पण असो ...) आणि मी नील्या सोबत राहत असल्यामुळे तिचे दोन (खरं तर .. चार सहा) बोल ऐकावे लागायचे. पण दोघेही बिचारे मला सोबत ठेवायचे (का मी काबाब मे हड्डी बनून राहायचो काय माहीत). मला आठवतं की माझ्या पहिल्या लेक्चर च्या वेळी हिनेच मला प्रोत्साहन दिलं होतं (हीच प्रोत्साहन पण धमकावण होतं म्हणा 😊) पण मला अक्षरशः ढकलल होतं वर्गात.

आमचा विज्या (विजय दीनानाथ चौहान .... इरर चौधरी) म्हणजे एक अजबच रसायन होतं. माणूस म्हणून हा पण एकदम layered होता. वरून लक्षात नाही येणार पण काही बाबतीत एकदम अस्सल होता.

आणि वैभव म्हणजे आमच्या हॉस्टेल चा त्यातल्या त्यात सुधन्य माणूस. नित्या सोबत कसा काय टिकला काय माहिती पण वैभव कडून पण आयुष्यातले त्याचे अनुभव आणि धडे ऐकायला मिळायचे,

सतीश आठवतो मला अजूनही. हसमुख माणूस. आणि काय भक्तीगीत गायचा. आहाहा.. खूपच सुंदर. हॉस्टेल च्या बाहेरच्या रस्त्यावर बसून घालवलेल्या कित्येत रात्री आठवतात. हा पण मला लहान म्हणून सांभाळून घ्यायचा. त्याचा तो हसरा चेहरा आजही स्पष्ट आठवतो. खूप लवकर गेलास मित्रा. अजूनही विश्वास बसत नाही.

मग जरा दूरच्या हॉस्टेल वरून पण अनिरुद्ध मुळे सचिन सोबत ओळख झाली. खरं तर मैत्री नाही झाली माझी सचीनशी लगेच. कारण सचिन सर्वांमध्ये तसा सधन कुटुंबातला होता. अतिशय कॉन्फिडेन्ट आणि सेल्फ अवेअर का काय म्हणतात तसा ( आणि अजूनही आहे). आणि मी अगदीच मुळूमुळीत होतो. [तसा मी सचिन ला चड्डी मित्र पण म्हणू शकतो.. 😊 त्याची batu मधे असतांना एक सवय होती. कपडे खराब होऊ नये म्हणून का खूप गरमी असायची म्हणून हा रूम वर आला की अंतरवस्त्रावर यायचा आणि मग बसायचा.]

पण आता इतके वर्ष मी सचिन सोबत आहे. आमची प्रोफेशनल वाटचाल खूपच समांतर झाली. आणि त्यात मग त्याला अजून जवळून बघायचा, समजून घ्यायचा योग आला. आणि सुरुवातीचे माझ्या मनातले समज बदलले. खरं तर सचिन आणि त्याचे संपूर्ण कुटुंब आता अगदी घरचेच वाटतात. आणि माझ्यासाठी खूप साऱ्या (किवा साऱ्याच) गोष्टींसाठी सल्ला घ्यायचं एक हक्काच ठिकाण म्हणजे सचिन, आम्ही त्याला चिडवतो की त्याने एखाद्या गोष्टीचा विचार केला, त्याच्या मनात इच्छा जरी झाली तरी ती गोष्ट आपोआप घडते .. (तो शाहरुख चा डायलॉग आहे एका पिक्चर मधला. तो याला लागू होतो). पण खरं कारण हे आहे की हा मनुष्य सगळं खूप व्यवस्थित प्लॅन करतो. आणि एकदा एखादी गोष्ट ठरवली की मग निर्णय घेतांना याची चलबिचल होत नाही. त्याचा मूळ स्वभाव त्याला मदत करतो.

अजूनही खूप लोक होती. काही प्रोफेसर होते. एका प्रोफेसर चा तर मी इतका लाडका होतो की मी उत्तीर्ण होऊन दूर जाईल ह्या भीतीनेच त्यांनी मला चार वेळा नापास केले होते 😊

हा एकंदर अनुभव खूप नवीन होता माझ्यासाठी. ही अशी माणसे नव्हती भेटली मला आधी किवा भेटली असतील तरी इतका सहवास नव्हता लाभला. किवा मी आधी या अनुभवांसाठी तेव्हडा तयार नव्हतो. पण batu ने ती संधि दिली. एकाएक मी नवीन झोळ पांघरून बाहेर पडलो, बदललो असं नाही पण ही सर्व माणसे, हे सर्व अनुभव नंतर सोबत राहिले आणि हळू हळू का होईना, मला मार्ग काढता आला. हळू हळू का होईना मी माणसांत आलो. 😊

या सगळ्यांना अजूनही मित्र म्हणवू शकतो याचा खरंच आनंद आहे. मी खूप काही संपर्कात नाही आहे सगळ्यांच्या. लोकांशी सहज फोन करून बोलणे मला अजूनही जमत नाही. पण कधीही निवांत बसलो असेल तर सगळेच आठवतात. भारी वाटतं. यांनी मला काय दिलं हे या सर्वांना कदाचित कळणार नाही. पण मी ज्या मानसिक अवस्थेत होतो, मी ज्या अनुभवांतून आलो होतो त्या परिस्थितीत आजाणतेपणे का होईना या सर्वांनी मला माझ्या त्या अवस्थेतून बाहेर यायला मदत केली.

यांना थॅंक यू म्हटलं तर मारतील मला .. पण मग अजून काय म्हणावं?


Comments

  1. छान लिहिलेस . सगळ्या आठवणी टवटवीत झाल्यात. Batu ने खरंच एक आठवणींचा ठेवाच दिलाय.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आपुलकी

लग्न!!