लग्न!!

सहा वर्ष होत आलीत लग्नाला. लग्नाच्या वेळेची धाकधूक, भविष्या बद्दल संभ्रम, अनिश्चितता अजूनही आठवते. मला नेहमीच वाटतं की लग्न म्हणजे permanent marker ने पेपर सोडवण्यासारख आहे. एकदा का एखाद्या उत्तरावर टिक केलं की नंतर ते उत्तर खोडून दुसरं लिहिता येत नाही. लग्नाच्या आधी दुसऱ्यांचे लग्नाचे अनुभव ऐकून, पाहून जरा भीती पण वाटायची. त्यात आम्हाला कोण्या पोरीने कधीच भाव न दिल्यामुळे आई वडीलांना तेही एक काम आमच्यासाठी करावं लागणार होते. पोरी पाहणे (आणि स्वतःला दाखवून घेणे) ह्याचं सुद्धा टेन्शन होतंच.
पण मी भारतात परत आल्यानंतर दोन दिवसांत मी एंगेज होतो काय आणि पुढे ते सत्य स्वतःला पटवे पर्यंत एका महिन्यात लग्न होऊन बायको नामक गोष्ट घरी येते काय ..... सगळच स्वप्नवत.
बायको. लग्नाच्या आधी मुलींविषयी असणारे समज (खरं तर गैर)  हळूहळू दूर होवू लागले. स्त्रियांविषयी मला नेहमीच आदर होता. पण एखादी स्त्री फक्त आपलं त्या माणसाशी लग्न झालय म्हणून त्याला आपलं सर्वस्व कस काय मानू शकते आणि त्याच्यासोबत आयुष्यभर राहण्याच्या आणाभाका कशा घेवू शकते हे मला कोडं होतं. खरं तर दोन अनोळखी, वेगळे आणि जीवनाबद्दल स्वतंत्र दृष्टीकोन असणारे लोक फक्त लग्न झालय म्हणून एकत्र आयुष्य जगतात याचच आश्चर्य होतं मला. (बायकोने वाचल तर काही खैर नाही .... प्रायोगिक लग्न केलं का असं विचारू शकते ती..).
पण आज इतक्या वर्षानंतर, जरी ते कोडं अजून सुटलेलं नाही तरी, हे मात्र खरं की मला आता कुणी म्हटलं की तुला तुझं bachelorhood परत देतो तर मी नाही म्हणेल. जवाबदारी, काळजी (बायकोच्या शिव्या, लाटण्याचा मार, बंद पडलेल्या काही "चांगल्या" सवयी .. हे सगळ स्वगत) हे जरी असलं तरी एक मेकांची साथ आयुष्यात खूप नवीन आणि सुंदर रंग भरते. तिला आवडतं म्हणून केलेल्या एखाद्या गोष्टी मुळे तिचा खुललेला चेहरा पहिला की आसमान ठेंगण वाटतं. (ओहो ... तोंड पहा आरश्यात. कधी काही केल्याचं मला तरी आठवत नाही. इति बायको.) सगळ सांगता येईल, शेअर करता येईल अशी एक मैत्रीण भेटते लग्नानंतर. आणि कुठल्याही परीस्थित ती आपली साथ देईल असा विश्वास पण लाभतो.
एकंदर एकमेकांना साथ देत आयुष्य नावाची ढकलगाडी वाहताना मजा येते. ढकलगाडीत हळूहळू बऱ्याच गोष्टी जमा होताहेत. काही आपण जमा केलेल्या काही आपल्या लोकांनी टाकलेल्या. त्यात बरीचशी स्वप्नं आहेत, इच्छा आहेत, जवाबदारी आहे, अपेक्षा आहेत आणि बरेचशे प्रश्न सुद्धा आहेत. पण त्यांचं टेन्शन नाही येत. दोघं मिळून वाहून नेऊ सगळं याचा विश्वास आहे.

Comments

Popular posts from this blog

मित्रहो

आपुलकी